Ad will apear here
Next
काचेवरच्या कसरतीची शतकपूर्ती
राहुल लोहकरेपुण्यातला राहुल लोहकरे नावाचा एक अवलिया कलाकार गेली १४ वर्षं काचप्रतिमांच्या निर्मितीची अनोखी कला सादर करतो आहे. केवळ तीन मिलिमीटर जाडीच्या स्टेन ग्लास हातानं कापून तो देवतांच्या प्रतिमा साकारतो. हे काम खूप चिकाटीचं, किचकट, वेळखाऊ आणि काचेचं असल्यानं धोकादायकही आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असूनही त्यानं ही कला आवडीनं जोपासली असून, त्यावरच त्याचा चरितार्थही अवलंबून आहे. नुकतीच त्याला १००व्या काचप्रतिमेची ऑर्डर मिळाली आहे. तसंच आज (२६ जानेवारी) त्याचा वाढदिवसही आहे. या दोन्हींचं औचित्य साधून त्याच्या या वेगळ्या वाटेवरच्या प्रवासाची म्हणजेच काचेवरच्या कसरतीची कहाणी वाचू या त्याच्याच शब्दांत...
..............
नमस्कार. मी राहुल लोहकरे. गेली १४ वर्षं मी स्टेन ग्लास आर्टिस्ट म्हणून काम करतो आहे. २६ जानेवारी २००४ रोजी मी पहिल्या काचप्रतिमेचं काम सुरू केलं. नाजूक काचेतून अनेक देवतांच्या प्रतिमा माझ्या हातून साकारल्या गेल्या. त्यात अनेकदा मी जखमी झालो, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आल्या, आर्थिक प्रश्न तर कायम सोबतीला होताच; पण अनेक चांगली माणसंही भेटली आणि या १४ वर्षांत माझ्या कलेचा प्रवास आता १०० प्रतिमांपर्यंत येऊन पोहोचला आहे. आज, २६ जानेवारी २०१८ रोजी १००व्या काचप्रतिमेची ऑर्डर माझ्या हातात आहे. त्यामुळे खूप चांगलं वाटतंय. या निमित्तानं माझा प्रवास तुमच्यासमोर मांडतो आहे. त्याआधी माझी कला नेमकी कशी आहे, याबद्दल थोडं सांगतो. म्हणजे त्यातलं वेगळेपण तुमच्या डोळ्यांसमोर उभं राहू शकेल.

अशी बनते काचप्रतिमा...
ज्याची प्रतिमा करायचीय, त्या चित्राची त्याच आकारातली डिजिटल प्रिंट काढून घेतो. तिचं काही दिवस निरीक्षण केल्यावर कोणत्या रंगाच्या काचा लागतील आणि त्या कुठे कापाव्या लागतील, याचं चित्र मनात तयार होतं. मग आवश्यक रंगांच्या स्टेन ग्लास (म्हणजे रंगीत काचा) आणतो. पीतांबर असेल, तर पिवळी, देवीची साडी लाल असेल, तर लाल, अशा वेगवेगळ्या रंगांच्या काचा विकत आणतो. चित्रानुसार त्या काचा हिरकणीनं कापतो. हे काम खूप नाजूक असतं. त्यात थोडीशी चूक झाली, तरी पूर्ण काच वाया जाते. मग पैसे आणि वेळ अशा दोन्हींचं नुकसान होतं. त्यामुळे ते खूप काळजीपूर्वक करावं लागतं आणि यातच माझं कौशल्य आहे. मला कागदावर चित्र काढायला जमत नाही; पण काचेवर मात्र मी हव्या त्या आकारात कोरीव काम करू शकतो. हिरकणीनं कापलेल्या काचेच्या तुकड्यांवर कॉपर फॉइल चिकटवतो; मग हे तुकडे ‘सोल्डरिंग आयर्न’नं ‘सोल्डर’ करून चिकटवतो. या प्रकारे सगळ्या रंगांचे तुकडे जोडून अख्खी प्रतिमा तयार करतो. देवतांच्या शरीराचा रंग म्हणजेच बॉडी कलर दर्शविण्यासाठी मात्र काचेचा तो भाग रंगवावा लागतो. कारण त्या रंगाच्या काचा मिळत नाहीत. मुकुट, दागिने अशा प्रकारची कलाकुसर पिवळ्या रंगाच्या काचेचं कोरीव कामातून मी साकारतो.

अशा प्रकारे साकारलेली प्रतिमा उभी करण्यासाठी सुताराकडून लाकडी फ्रेम तयार करून घेतो. त्या फ्रेममध्ये पाठीमागे ट्यूबलाइट लावल्यानंतर विविध रंगांच्या काचांतून त्या त्या रंगाचा प्रकाश येतो आणि प्रतिमेचं खरं सौंदर्य दिसतं. एक प्रतिमा तयार व्हायला तिच्या स्वरूपानुसार साधारणपणे १५ दिवसांपासून दोन महिन्यांपर्यंतचा कालावधी लागतो. हे सगळं काम मी एकट्यानं, आईच्या मदतीनं आणि हातानं करतो. काचेचं काम करताना काही वेळा हाताला आणि पायालाही काच लागते. बोट कापलं असलं, तरी काम ठरलेल्या वेळेतच पूर्ण करावं लागतं.

श्रीगणेशा बालाजीपासून...
मी दीड वर्षाचा असताना माझे वडील देवाघरी गेले. आईनं मला माझ्या आजोळी ठेवलं होतं. आजीनं माझा सांभाळ केला. माझं दहावीपर्यंतचं शिक्षण सोनई (ता. नेवासा, जि. अहमदनगर) गावात झालं. शिक्षणात माझं मन जास्त रमलं नाही. मी दहावीत नापास झालो. आई पुण्यातच राहून नोकरी करत होती. नंतर आईनं पुण्यात विठ्ठलवाडीत १० बाय १२ची छोटीशी खोली भाड्याने घेतली आणि मग तिथे आई आणि मी राहायला लागलो. आईला मदत करायची म्हणून मी कापडाच्या दुकानात, बेकरीमध्ये, तसेच ड्रायफ्रूटच्या दुकानात काम केलं. माझे मामा प्रकाश गोसावी हे शिल्पकार होते. काही दिवस मी त्यांच्याकडे काम केलं. वेगळं, नवीन काही तरी शिकायची माझी इच्छा होती. म्हणून मी काचेची कामं पाहायला जाऊ लागलो. हॉटेल, बंगले आदींच्या बांधकामांमध्ये स्कायलाइट डोम, विंडो पॅनल, पार्टिशन, फॉल्स सीलिंग, व लॅम्प शेडची कामं पाहताना मी मी काच कटिंग शिकलो. जेमतेम दोन ते अडीच हजार रुपयेच पगार मिळायचा. तेवढ्यातच देवदेवतांच्या प्रतिमा करण्याचा विचार माझ्या मनात आला नि तो मी आईजवळ मांडला. ‘पहिली काचप्रतिमा व्यवस्थित जमली, तरच काचप्रतिमेचं काम करायचं, नाही तर बाहेर कामाला जायचं,’ असं आईनं सांगितलं. आईनं काम करून मिळवलेले थोडे पैसे शिल्लक ठेवले होते. त्यातले पैसे तिने सामानाकरिता दिले आणि मी माझ्या वाढदिवशी, २६ जानेवारी २००४ रोजी पहिल्या, श्री बालाजीच्या काचप्रतिमेच्या कामाला सुरुवात केली. ती पूर्ण करण्यासाठी चार-पाच महिने लागले. कारण तोपर्यंत मी करत असलेल्या कामापेक्षा हे वेगळं काम होतं. शिवाय ऑर्डर नसतानाच मी ते करत होतो. त्यामुळे घरखर्चाचा प्रश्न होताच. मग मी त्याच्या जोडीनं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती रंगवून देण्याचं कामही करू लागलो. गौरी-गणपतीमध्ये गौरींचे प्लास्टर ऑफ पॅरिसचे व पितळी मुखवटे रंगवून द्यायचो. दिवाळीच्या वेळी मोठ्या बंगल्यामध्ये जाऊन तुळशी वृदावनं रंगवण्याची कामं करायचो.

पहिली प्रतिमा विकली, पण...
श्री बालाजीची काचप्रतिमा पूर्ण झाल्यावर ती विकायची कुणाला, हा प्रश्नच होता. वेगवेगळी दुकानं आम्ही महिना-दीड महिना बसनं, पायी फिरून पालथी घातली नि नकार घेऊन परतलो. दरम्यान, वेंकीज ग्रुपची व्यंकटेश्वरा नावाची मोठी बिल्डिंग आम्ही राहतो तिथे जवळच होती. व्यंकटेश्वरा बालाजीचं नाव असल्यानं तेथे ही काचप्रतिमा घेतील, असा विचार मनात आला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आई आणि मी त्या ऑफिसमध्ये गेलो. तिथून कॅम्पमधल्या दुसऱ्या ऑफिसचा पत्ता मिळाला, तिथे गेलो. पॉश ऑफिसमध्ये जाण्याचा पहिलाच प्रसंग होता. वॉचमननं अडवलं; पण शेवटी विनंती केल्यावर त्यानं एका अधिकाऱ्याकडे नेलं. त्यानं मोठ्या साहेबांकडे आम्ही आल्याचं सांगितलं. त्यांनी भेटायची तयारी दर्शवली; पण दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावलं; पण असे किती तरी दिवस आम्ही बसनं एवढ्या लांब जाऊन चार-पाच तास थांबून परत येत होतो. तिकिटाचे पैसे आणि वेळ, दोन्हीही वाया जात होतं. अखेर एके दिवशी ठरवलं, की आज इथं येण्याचा शेवटचा दिवस असेल. आज साहेबांची भेट झाली नाही, तर परत यायचं नाही नि काचप्रतिमाही करायची नाही. प्रतिमेला लावलेला वर्तमानपत्राचा कागद बसमधून नेताना काही ठिकाणी फाटला होता. त्या दिवशी त्या साहेबांना भेटण्यासाठी एक स्वामी त्या ऑफिसात आले होते. त्यांना त्या फाटलेल्या कागदातून बालाजीच्या काचप्रतिमेवरचं चक्र दिसलं. त्यांनी मला बोलावून विचारणा केली. त्यांची भाषा तमिळ असावी, मला ती कळली नाही; पण त्यांच्यासोबत दुभाषी होता. त्यामुळे हिंदीत संवाद झाला. ‘हे काम वेगळं दिसतंय, कसं केलं’ असं त्यांनी विचारलं. हातानं इम्पोर्टेड रंगीत काचा कापून ती प्रतिमा केल्याचं त्यांना कळताच आश्चर्य वाटलं नि ति प्रतिमाही आवडली. ‘साहेबांनी पाहिलं आहे का,’ असंही त्यांनी विचारलं. ते साहेबांच्या केबिनमध्ये गेल्यावर दोनच मिनिटांत आम्हाला बोलावल्याचा सांगावा आला. त्यांनी ती तातडीने विकत घेतली आणि त्याचे पैसे चेकद्वारे देण्यासाठी त्यांनी रिसेप्शनिस्टकडे फोन नंबर द्यायला सांगितला; पण आमच्याकडे तेव्हा फोन नव्हता. रिसेप्शनिस्टला मी तसं सांगितलं नि परत कधी येऊ ते विचारलं; पण फोन नंबर द्यावाच लागेल, असं ती म्हणाली. मग आईनं पुन्हा आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवलेले पैसे वापरून फोन घेतला नि प्रश्न सोडवला; पण परत आमच्यापुढे खर्चाचा प्रश्न उभा राहिला.

बाकीची कामं...
फॉल्स सीलिंगमग आम्ही दोघं आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर यांच्या ऑफिसमध्ये जाऊन कामाची माहिती देऊ लागलो. ते आमच्या शो-रूमबद्दल, फोटोंबद्दल नि व्हिजिटिंग कार्डबद्दल विचारायचे; पण यातलं काहीच नव्हतं. व्हिजिटिंग कार्डही छापणं शक्य नव्हतं. शेवटी पैसे मिळविण्यासाठी मी घर आणि दुकानं रंगवायची कामं करू लागलो. ऑईलपेंट व डिस्टेंपरची कामं करायचो. हॉटेल व बंगल्याचं नवीन काम चालू असलं, तर तिथं भेटायचो आणि त्यांना स्टेन्ड ग्लास कामाची माहिती द्यायचो. पुण्यात फर्ग्युसन रोडवर निरंजन डायनिंग हॉलचं काम चालू असलेलं मला कळल्यावर मी त्या हॉटेलच्या मालकांना भेटलो. त्यांनी मला काम द्यायची तयारी दर्शविली आणि फॉल्स सीलिंगच्या कामाची वेळ आली की कळवतो, असं सांगितलं; पण मला कामाची खूप गरज असल्यानं मी त्या हॉटेलवर दोन महिवे दररोज सायकलवरून जाऊन बघायचो. अखेर त्यांनी मला काम दिलं आणि काम देताना म्हणाले, ‘काम आधीच दिलं होतं; पण तुझी काम मिळवण्याची जिद्द बघितली आणि मला मनापासून वाटलं, की तुला काम द्यावं.’ अशा प्रकारे हॉटेलमधल्या फॉल्स सीलिंगचं पहिलं काम मिळालं. ते मी वेळेत पूर्ण केलं, त्यांना ते आवडलंही. कुठलीही ओळख नसताना त्यांनी काम दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानले.

शनिशिंगणापूर आणि पहिली प्रसिद्धी...
माझ्या आजोळी माझे दुसरे मामा मुकुंद गोसावी शनिशिंगणापूर देवस्थानमधील मूर्ती रंगवायचं काम करायचे. त्यांनी त्या देवस्थानच्या ऑफिसमध्ये माझ्या काचप्रतिमेच्या कामाबद्दल माहिती दिली नि संधी देण्याबद्दल सुचविलं. मामांसोबत मी ऑफिसमध्ये गेलो नि त्यांना श्री बालाजीच्या काच प्रतिमेचा फोटो दाखविला. त्यांना काम आवडलं आणि मला रथावर स्वार असलेल्या शनिमहाराजांच्या काचप्रतिमेची ऑर्डर देवस्थाननं दिली; पण त्यांनी अॅडव्हान्स देऊ शकत नसल्याचं सांगितलं. मग माझे आणखी एक मामा नंदकुमार गोसावी यांनी मटेरियलकरिता पैसे दिले. त्याची परतफेड करण्याबद्दलही मी मामाला सांगितले. शनिशिंगणापूर येथे सख्ख्या मामा-भाच्यांचं महत्त्व आहे. त्यामुळे भाच्याच्या कलेसाठी मामाची मदत हे सर्व शनिमहाराजांनीच जुळवून आणलं असावं, असं वाटतं.

बालाजीची प्रतिमा २० इंच बाय ३० इंच आकाराची होती. शनिमहाराजांच्या प्रतिमेचा आकार ४२ इंच बाय ५२ इंच एवढा अपेक्षित होता. मोठी काचप्रतिमा करण्यासाठी माझ्याकडे टेबल नव्हते आणि नवीन टेबल घेण्याएवढे पैसेही नव्हते; मग एक जुनं टेबल विकत घेतलं आणि त्यावर काम सुरू केलं. पहिलंच काम देवस्थानचं मिळाल्याबद्दल आनंद होता; पण मोठ्या काचप्रतिमेचा अनुभव नसल्यानं टेन्शनही होतं; पण आईनं धीर दिला आणि ते काम चांगल्या पद्धतीनं पूर्ण झालं. ते काम सुरू असताना एक जण विंडो पॅनेलचं काम करून घेण्यासाठी घरी आले होते. त्यांना शनिमहाराजांच्या प्रतिमेचं काम आवडलं. त्यांनी ‘लोकसत्ता’चे एक पत्रकार ओळखीचे असल्याचं सांगितलं. ते पत्रकार दोन-तीन दिवसांत घरी आले नि त्यांनी मी छोट्या जागेत, अडचणीत काम करत असल्याचं पाहिलं नि त्याबद्दल ‘लोकसत्ता’मध्ये लेख लिहिला. तो माझ्याबद्दल आलेला पहिला लेख. दरम्यान, शनिमहाराजांची काचप्रतिमा २६ जानेवारीलाच पूर्ण करून दिली. ती प्रतिमा देवस्थानच्या प्रशासकीय ऑफिसमध्ये आहे. माझ्या वाढदिवशी तिथे माझा, माझ्या आईचा नि आजीचा सत्कार करण्यात आला. तो माझ्या आयुष्यातील खूप मोठा दिवस. काचप्रतिमेच्या कलेच्या रूपाने आई व आजीबरोबर मिळालेला पहिला मान होता तो. नंतर एकांच्या ओळखीतून राघवेंद्र स्वामींच्या प्रतिमेचं काम मिळालं. त्यांना अहमदनगरच्या मठात वेगळ्या प्रकारे चित्र हवं होतं. त्यांना काचप्रतिमेची कल्पना आवडली नि दोन बाय तीन फूट आकाराची प्रतिमा महिन्याभरात मी पूर्ण केली. ती सर्वांना आवडली आणि ती मठात बसवण्यात आली.

नोकरीची ऑफर आली, पण...
दरम्यान, मी केलेली पहिली प्रतिमा विकत घेतलेल्या साहेबांचा व्यंकटेश्वरा हॅचरीजमधून फोन आला आणि त्यांनी ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. घरखर्च कसा चालतो, त्याबद्दल विचारलं नि नोकरीची ऑफर दिली; पण मी त्यांचे आभार मानले आणि संघर्ष करावा लागला, तरी हेच काम करणार, असं त्यांना सांगितलं. सचिन तेंडुलकरच्या शतकांच्या आदर्श माझ्यासमोर असून, काचप्रतिमांचं शतक करण्याचं स्वप्न डोळ्यांसमोर असल्याचं मी त्यांना सांगितलं. साहेबांनी माझा विचार चांगला असल्याचं नि काही मदत हवी असल्यास सांगायला सांगितलं. श्री बालाजीची तीन फूट बाय पाच फूट आकाराची मोठी प्रतिमा त्यांनी ऑफिससाठी करून घ्यावी, असं मी त्यांना सुचविलं. ही मोठी प्रतिमा सांभाळण्याबाबत त्यांना शंका होती; पण त्याला प्लायवूडचा बॉक्स असेल, असं सांगितल्यावर त्यांनी ती ऑर्डर मला दिली आणि अॅडव्हान्स देऊन काम सुरू करायला सांगितलं. त्यामुळे आईला व मला खूप आनंद झाला.

पुन्हा एकदा बालाजी...
श्री बालाजीच्या चित्राची तीन फूट बाय पाच फूट आकाराची डिजिटल प्रिंट आणली आणि टेबलावर ठेवली. ही प्रतिमा मोठी होती. त्यामुळे सुरुवातीला १० ते १२ दिवस फक्त विचार करायला लागला, की काच कटिंग कसे करायचे. कारण कटिंग करता येते म्हणून नुसत्या काचा कापून उपयोग नाही. देवतेची प्रतिमा असल्याने नाजूकपणाचाही विचार करावा लागतो. मग प्रतिमेच्या कामाला सुरुवात केली आणि रंगीत काचा आणण्यासाठी मुंबईला गेलो. श्री बालाजीच्या प्रतिमेमध्ये सोने जास्त असल्यामुळे वेगवेगळ्या सात-आठ शेडच्या पिवळ्या रंगाच्या काचा मला हव्या होत्या. पहिल्यांदा फक्त तीन शेडच्या काचा मिळाल्या. त्यावर काम सुरू केलं. त्या काच प्रतिमेमध्ये एकूण २५ ते २६ रंगांच्या काचा वापरल्या. कापलेल्या काचांचे एकूण तुकडे ३५० ते ४०० होते. ही प्रतिमा पूर्ण होण्यासाठी तीन महिने लागले. मी तसं साहेबांना कळवलं. ‘आमचे स्वामी काचप्रतिमा बघायला घरी येतील. त्यांना व्यवस्थित झाल्याची खात्री पटली, तर ते जो दिवस सांगतील त्या दिवशी आम्ही ती घेऊन जाऊ. आमची खोली १० फूट बाय १२ फूट आकाराची. फ्रेमसह काचप्रतिमेचा आकार सहा फूट बाय चार फूट होता. त्यात फ्रेममध्ये ट्यूबलाइटही लावलेली होती. पावसाळ्याचे दिवस होते. एक दिवस अचानक जोरात पाऊस आला आणि ती प्रतिमा ठेवली होती तिथे वरचा पत्रा भरपूर गळायला लागला. मी काचप्रतिमेच्या वर बादली धरून ठेवली आणि भरली की आईकडे ओतण्यासाठी देत होतो. शेजाऱ्यांच्या मदतीने ती प्रतिमा थोडी हलवली. ती अख्खी रात्र आई आणि मी जागून काढली. साहेबांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला; पण ते परदेशी असल्याने संपर्क होईपर्यंत दोन दिवस गेले. प्रतिमा घरात ठेवण्यातली अडचण त्यांना कळल्यावर अखेर त्यांनी स्वामीजींना प्रतिमा पाहायला पाठविले; पण ते आल्यावर त्यांनी अगदी मिलिमीटरप्रमाणे तपासायला सुरुवात केली. त्यामुळे मला टेन्शन आलं. मी दुभाषाला सांगितलं, की हे हँडमेड असल्याने त्यात मिलिमीटरमध्ये चूक असू शकते; पण अखेर ते स्वामींना आवडले आणि माझा जीव भांड्यात पडला. त्यांनी लगेच तिथूनच साहेबांना फोन केला आणि काम उत्कृष्ट झाल्याचं सांगितलं. मग ती प्रतिमा व्यवस्थित साहेबांच्या ऑफिसमध्ये पोहोचली. साहेबांनाही ती आवडली. दोन महिन्यांनी त्यांचा फोन आला नि त्याच आकारात श्री पद्मावती देवीची काचप्रतिमा करून द्यायला सांगितले. स्वामीजींनीच माझ्याकडून प्रतिमा करून घ्यायला सांगितल्याचंही त्यांनी सांगितलं, त्यामुळे मला अधिक बरं वाटलं. ती काचप्रतिमा मी दोन महिन्यांत पूर्ण करून दिली. असं करता करता व्यंकटेश्वरा हॅचरिजमध्ये मी विष्णूचे दशावतार, श्री विष्णूचे विराट रूप, श्री बालाजी, श्री हाथीरामजी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, श्री लक्ष्मी नारायण, श्री ब्रह्मा विष्णू महेश, श्री बालाजी व श्री अष्टलक्ष्मी अशा विविध काचप्रतिमा करून दिल्या. 

सोशल मीडियाचा आधार...
तिथलं काम पूर्ण झाल्यानंतर काही घरगुती, छोट्या काचप्रतिमांची ऑर्डर यायची; पण ऑर्डर येण्यामध्ये खूप अंतर असायचं. कधी कधी असं वाटायचं, की हे काम बंद करावं; पण आई नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असायची. मी १०० तरी काचप्रतिमा कराव्यात, अशी तिची इच्छा होती. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू होते. माझ्याकडे जाहिरातीसाठी कोणतंही साधन नव्हतं. ‘माउथ टू माउथ’ पब्लिसिटी होईल तेवढीच. त्यामुळे  दर वर्षी फक्त चार ते पाच काचप्रतिमांची ऑर्डर मिळायची; पण प्रयत्न सोडले नाहीत. नंतर माझ्या मामांनी २०१२मध्ये मला फेसबुक अकाउंट ओपन करून दिलं आणि त्यावर माहिती शेअर करायला सांगितलं. पहिली तीन वर्षं तिथे काही रिस्पॉन्स मिळाला नाही. नंतर फेसबुकच्या ग्रुपबद्दल माहिती कळली आणि काही ग्रुपमध्ये जॉइन झालो. त्यामध्ये काचप्रतिमेच्या पोस्ट शेअर करायचो. मग काही जणांनी मला व्हॉट्सअॅप ग्रुपलाही अॅड केले. त्यावर मी तयार करून दिलेल्या काचप्रतिमांचे फोटो आणि काचप्रतिमा कशी तयार केली जाते, याची माहिती मी शेअर करू लागलो. नंतर फेसबुकमुळे काचप्रतिमेची कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली. मला फेसबुकवरून पहिली ऑर्डर श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेची मिळाली.

एक किस्सा आहे तिरुपतीचा. मी आणि आई दर वर्षी तिरुपतीला दर्शनाला जातो. तिथे दर्शनाच्या लाइनमध्ये उभे असताना तिथे पहिल्यांदाच आलेल्या एका व्यक्तीने बालाजीची फ्रेम कुठे मिळेल याची चौकशी माझ्याकडे केली. मग मी त्यांना चार-पाच दुकानांची नावं सांगितली आणि त्यांना मी काचप्रतिमेबद्दलही सांगितलं. त्यांनी मला तिथेच ५०० रुपये देऊन ऑर्डर दिली आणि बालाजीची काचप्रतिमा करायला सांगितलं. बाकीचे पैसे अकाउंटला जमा करतो, असं त्यांनी सांगितलं. ती ऑर्डर वेळेत पूर्ण केल्यावर त्यांनी लालबागच्या राजाच्या काचप्रतिमेची ऑर्डर दिली. त्या प्रतिमेचा फोटो फेसबुकवर काही ग्रुपमध्ये शेअर केल्यावर मला एकांचा फोन आला आणि त्यांनी गोंदवलेकर महाराजांच्या काचप्रतिमेची ऑर्डर दिली. ते प्रत्यक्ष भेटायला आल्यावर त्यांनी लालबागच्या राजाची काचप्रतिमा प्रत्यक्ष बघितली आणि त्यांनी गोंदवलेकर महाराजांबरोबरच रामदरबाराच्या प्रतिमेचीही ऑर्डर दिली. रामदरबाराची प्रतिमा माझ्या हातून घडावी, अशी आईची इच्छा होती. ती प्रतीक्षा ८०व्या काचप्रतिमेवेळी म्हणजे १० वर्षांनी संपली... आणि राम दरबाराची काचप्रतिमा टर्निंग पॉइंट ठरली.  लोकांनी त्या काचप्रतिमेचे भरभरून कौतुक केले. काही दिग्गज मंडळी माझ्यासारख्या सामान्य कलाकाराच्या घरी आली आणि त्यांनी त्यांचे बहुमूल्य अभिप्रायही दिले. कलाकाराला त्याच्या कलेची पोचपावती मिळणं, ही खूप मोठी शाबासकी असते. त्यामुळे पुढील काम करण्याकरिता ऊर्जा मिळते आणि उत्साह वाढतो. त्याचा अनुभव मी या वेळी घेतला. या वाटचालीत काही कटू अनुभवसुद्धा आले. काही जणांनी फक्त आश्वासन दिलं, की तुला ऑर्डर देऊ; पण ते फक्त खेळवत राहिले; पण विविध माध्यमांतल्या पत्रकारांनी मात्र मला चांगले सहकार्य केले. त्यांनी माझ्या कलेवर लेख लिहून काचप्रतिमेची कला लोकांपर्यंत पोहोचवण्यास मोलाचं सहकार्य केलं.

मी केलेल्या काही काचप्रतिमा...
शनिशिंगणापूर देवस्थानात शनिमहाराजांची रथात स्वार असलेली, शनैश्वर देवस्थानाच्या हायस्कूलमध्ये सरस्वती देवीची, शनैश्वर देवस्थानाच्या प्रसादालयामध्ये अन्नपूर्णा देवीची आणि शनैश्वर देवस्थान संचलित ग्रामीण रुग्णालयामध्ये आरोग्यदेवता धन्वंतरीची, तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि विठ्ठल रुक्मिणी अशा ११ काचप्रतिमा करण्याची संधी शनिशिंगणापूर देवस्थानानं मला दिली आहे. अक्कलकोट येथील प्रसादालयामध्ये अन्नपूर्णादेवीची काचप्रतिमा एका भक्तानं माझ्याकडून करून घेऊन तिथं अर्पण केली आहे. मुंबईत चेंबूर येथील स्वामींच्या मठात श्री स्वामींची लक्ष्मीरूपातील काचप्रतिमा, अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजारच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्री सरस्वती देवी आणि सावित्रीबाई फुलेंची काचप्रतिमा मी करून दिली आहे. रत्नागिरीचं ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरीची काचप्रतिमा त्या देवस्थानानं माझ्याकडून करून घेतली आहे. त्याशिवाय साउथ इंडियन गणेश, ब्रह्मा-विष्णू-महेश, गरुडस्वार विष्णू, श्री विष्णूचे विश्वरूप, श्री लक्ष्मीनारायण, श्री विष्णूचे दशावतार, कुबेर, महालक्ष्मी, तुळजाभवानी, संतोषीमाता, श्री बालाजीसमवेत श्री लक्ष्मी, श्री बालाजी व अष्टलक्ष्मी, श्री हाथीरामजी, दत्तगुरू, नृसिंहसरस्वती, हनुमान, पंचमुखी हनुमान, गोंदवलेकर महाराज, गोपालकृष्ण, राधाकृष्ण, योगानंद सरस्वती महाराज, गणेश महाराज, साईबाबा अशा अनेक देवतांच्या काचप्रतिमा माझ्या हातून घडल्या.

याशिवाय काही घरांसाठीही मी काचप्रतिमा करून दिल्या आहेत. होता होता माझा प्रवास ९९ काचप्रतिमांपर्यंत येऊन ठेपला आणि मला १००वी काचप्रतिमा कोणती करायला मिळते, त्याची उत्सुकता लागून राहिली होती. गेल्याच आठवड्यात माझी ही प्रतीक्षा संपली. पुन्हा एकदा शनिशिंगणापूरचं शनैश्वर देवस्थान माझ्यासाठी धावून आलं असून, त्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या देखाव्याच्या प्रतिमेची ऑर्डर मला दिली आहे. फ्रेमसह या प्रतिमेचा आकार सहा फूट बाय चार फूट असा असेल. त्यामुळे २६ जानेवारी २००४ रोजी सुरू झालेल्या या प्रवासात, मी आज, २६ जानेवारी २०१८ रोजी १०० काचप्रतिमांचा टप्पा गाठू शकलो आहे. त्यामुळे मला फार आनंद झाला असून, मी देवस्थानच्या अध्यक्षा आणि विश्वस्त मंडळाचा याबाबत शतशः आभारी आहे. आईचे आशीर्वाद, परमेश्वराची कृपा आणि कलाप्रेमी लोकांनी केलेलं सहकार्य आणि शुभेच्छा यांमुळे मी ही वाटचाल करू शकलो, अशी माझी भावना आहे. याच बळावर मी पुढेही कार्यरत राहणार आहे.

संपर्क : राहुल लोहकरे, जगताप चाळ, विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ, विठ्ठलवाडी, सिंहगड रोड, पुणे
मोबाइल : ७२७६८ ९०७६८, ९८२२६ ८२७७३

(राहुल लोहकरेने जोपासलेल्या काचप्रतिमानिर्मितीच्या कलेचा आढावा घेणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZPBBK
 khup sunder pratima
Congrats
 आयल्या कलाकृती चे वापल्या जिद्दी चै खरोखर जेव्हढे कौउतूक करावे तेव्हडे कमीच आहे,
स्वामींच्या कृपेने आपल्या कलाकृतीस भविष्यात भप
 Very beautiful
I dont have words to praise this art

Very difficult
Excellent job
Similar Posts
‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’ पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच
‘सूर्यदत्ता’करणार व्यसनमुक्ती, नीतिमूल्यांची रुजवण पुणे : ‘समाजातील व्यसनाधीनता दूर करून, नीती आणि मूल्यांचे शिक्षण देत समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यदत्ता ग्लोबल रिहॅबिलिटेशन सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. या पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर यांच्या हस्ते होणार आहे
‘माझ्यासाठी देश महत्त्वाचा’ पुणे : ‘देश हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, देश सर्वात मोठा आहे,’ असे मत कवी, गीतकार आणि भारतीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी व्यक्त केले.‘सीएनएन-टीव्ही १८’चे कार्यकारी संपादक भूपेंद्र चौबे यांनी जोशी यांची मुलाखत घेतली. पंचशील रिअल्टीचे अध्यक्ष अतुल चोरडिया आणि सागर चोरडिया या वेळी उपस्थित होते
‘गोखले कन्स्ट्रक्शन्स’तर्फे सलग सातव्या वर्षी नवरात्रोत्सवात घरखरेदीची सुवर्णसंधी पुणे : दर्जेदार निवासी गृहप्रकल्पांची निर्मिती व जुन्या निवासी इमारतींचा पुनर्विकास या क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या ‘गोखले कन्स्ट्रक्शन्स’तर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रात भव्य गृहमहोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language